Sankranti: हळदीकुंकू?

Back to Community Updates
"परदेशात राहूनही हळदीकुंकूच्या निमित्ताने जपलेली मातीची ओढ, मैत्री आणि मराठी संस्कृतीचा वारसा."

Sankranti: हळदीकुंकू?

अगं आई पण हळदीकुंकू म्हणजे नक्की काय ग? माझ्या सात वर्षाच्या मुलीचा हा प्रश्न ऐकून माझे डोळे बंद झाले आणि समोर उभी राहिली ती गावाकडची पहाट, सकाळी लवकर उठून आईसोबत केलेली फुलांची सजावट, हळदीकुंकू ने नटलेलं ताट, सुवासिनींच वाण आणि जमलेल्या काकूंसोबत केलेली गम्मत..

खूप छान वाटतं होतं ते सगळ परत आठवून आणि तेवढ्यात अचानक परत आवाज आला.. अगं आई, स्वप्नात गेली का?

माझे डोळे टचकन उघडले..

खरंतर तीन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही पोलंडमध्ये राहायला आलो तेव्हा पासून हळदीकुंकू काय असत हे मी विसरलेच होते.. पण मागील एक वर्षापासून पुन्हा एकदा मला सगळे सण साजरे करायची संधी मिळाली.. इथे मराठी मंडळी कमी असली तरी हळदीकुंकू च्या दिवशी आम्ही सगळ्या जणी एकत्र येतो.

इथे थंड हवामान, धावपळीचं आयुष्य आणि वेगळी संस्कृती असली तरी तो एक हक्काचा दिवस सगळ्यांना हवाहवासा वाटतो.

दूरदेशी राहणाऱ्या आमच्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एकमेकांना आधार देण्याचं, सुख दुःख शेअर करण्याचं आणि एकमेकींच्या धुंदीत नाचण्याचं एक आंगण ठरतं.... माहेरी जाण शक्य नसलं तरी पण ह्या दिवशी ते माहेरचे क्षण नक्कीच जगायला मिळतात..

हळदीकुंकू इथे फक्त सौभाग्याचं प्रतिक न राहता नवीन ओळखींचा, मैत्रीचा आणि आपुलकीचा वारसा बनतं.. मैत्रिणींच्या गप्पा, गमतीदार खेळ, निवांत वेळ या सगळ्यामुळे डोळे पाणावतात आणि घरची आठवण येते पण त्याच वेळी वाटतं, आपणच आता ही परंपरा पुढे नेऊ शकतो.. परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलांना हळदीकुंकू म्हणजे काय, मराठी संस्कृती म्हणजे काय, हे सांगण्याची हीच तर खरी सुवर्ण संधी आहे..

हळदीकुंकू माझ्यासाठी आता केवळ एक सण नाही, तो एक धागा आहे, मला माझ्या मातीशी जोडणारा, आपली माणसं जपणारा आणि दूर राहूनही "आपण कुठून आलो आहोत" हे सतत आठवण करून देणारा..

देश जरी बदलला, आयुष्याची दिशा बदलली पण हळदीकुंकू च्या दिवशी नकळत मला सापडते माझ्यातली ती हरवलेली मी...

शेवटी मी मनापासून धन्यवाद करते महाराष्ट्र मंडळ क्राको चे ज्यांच्यामुळे मला हे अनमोल क्षण पुन्हा एकदा जगायला मिळाले.


अनुराधा गिरी
महाराष्ट्र मंडळ क्रॅको (पोलंड)