एक छोटी मुलगी… आणि महाराजांशी सुरू झालेली आजीवन मैत्री !

Back to Community Updates
"शिवनेरीच्या धड्यातून सुरू झालेलं महाराजांशी नातं, परदेशातही अभिमानाने जपलेला वारसा."

एक छोटी मुलगी… आणि महाराजांशी सुरू झालेली आजीवन मैत्री!

“मम्मी, हा धड्यातला राजा कोण? एवढा धाडसी कसा होता तो?” चौथीतल्या एका मुलीने पुस्तकातली रंगीत चित्रं पाहताना विचारलेला तो पहिलाच प्रश्न… आणि तिच्या आयुष्याचा पहिलाच ठसा.

इतिहासाच्या धड्याचं नाव होतं शिवनेरी : शिवाजी महाराज जन्मस्थान. त्या पानावर तिला पहिल्यांदा भेटले छत्रपती शिवाजी महाराज आणि भक्कम, शांत, अढळ उभा असलेला शिवनेरी किल्ला.

त्या दिवसापासून तिच्या बालमनात काहीतरी हललं… एक ओढ, जी शब्दांच्या पलीकडची होती. एक अभिमान, जो अजून आकार घेत होता. आणि एक प्रेरणा, जी आयुष्यभर तिच्या सोबत राहणार होती.

धड्याच्या पलीकडे तिचा शोध सुरू झाला. वर्षागणिक इतिहासाची प्रत्येक पानं पलटताना ती पुन्हा पुन्हा महाराजांना भेटत राहिली. शाळा बदलली, वर्ग बदलले… पण तिच्या मनातला संवाद कायम राहिला.

“महाराज, तुम्ही इतकं कसं करू शकलात?” “काय शिकवू पाहताय तुम्ही मला?”

पुस्तकं तिचे नवीन, जिवलग मित्र झाले. श्रीमानयोगी हातात घेतला तेव्हा तिला महाराजांसोबत चालत असल्यासारखं वाटलं. पावनखिंड वाचताना कणखरपणा, त्याग, धैर्य तिच्या रंध्रांत उतरल्यासारखं झालं. छावा, दुर्गभ्रमणगाथा, शिवछत्रपती या पुस्तकांचे प्रत्येक पान, प्रत्येक कथा, प्रत्येक संवाद तिच्या मनात एकच सत्य उमटवत होते.

“आम्ही किती मोठ्या वारशाचे वारस आहोत…!” ही भावना घट्ट होत होती.

वेळ पुढे सरकत गेला. शिक्षण, धावपळ, स्वप्नं… आणि एक दिवस ती समुद्र ओलांडून परदेशात पोहोचली. नवीन भूमी, नवीन चेहरे, नवीन भाषा पण तिच्या मनातली ज्योत? ती पूर्वीइतकीच तेजस्वी.

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असली तरी तिच्या हृदयात शांतपणे गुंजणारा आवाज कायम होता, “महाराज, मी दूर आहे… पण तुमचं संस्कारमूल्य माझ्या सोबत चालतंय.”

ऑफिसमधील मीटिंग्समध्ये उभी राहताना तिला जाणवायचं आत्मविश्वास तिचा नाही, तो महाराजांनी रुजवलेला धैर्याचा वसा आहे. आव्हानं आली की मनात उसळून यायचं “धडाडीने पुढे जा. आपलं रक्त पराक्रमाचं आहे.”

परदेशात असताना जेव्हा कुणी भारताबद्दल विचारायचं, तेव्हा तिच्या आवाजात आपोआप अभिमान चमकून यायचा. कारण तिच्या ओळखीचं पहिलं पान ती विसरलीच नव्हती “मी त्या भूमीची मुलगी आहे, जिथे शिवनेरी उभा आहे…”

जबाबदाऱ्या वाढल्या, अनुभव वाढले, आकाश विस्तारलं… पण तिच्या आत जपलेलं ते नातं कधीच बदललं नाही. लहानपणी पहिल्यांदा रंगीत चित्रात भेटलेल्या महाराजांशी झालेलं ते नातं आजही तितकंच जिवंत, तितकंच शाश्वत.

नुक्त्याच पार पडलेल्या महाराष्ट्र मंडळ क्राकोवच्या शिवजयंती कार्यक्रमात जेव्हा तिची सावली महाराजांच्या गोष्टी सांगत उभी होती, तेव्हा तिच्या मनात अभिमानाचा ऊर भरून आला. मुलांच्या डोळ्यांतील कुतूहल पाहून तिला जाणवलं… ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचते आहे. ती आजही मनातल्या मनात म्हणते “महाराज, तुमचं शिकवणं आमच्यासाठी आयुष्यभर पुरेल. मी जिथेही जाईन… माझा अभिमान, माझं माणूसपण, माझी ओळख तुमच्याकडूनच उगम पावलेली असेल.”

कारण एका इतिहासाच्या धड्याने एका छोट्या मुलीसाठी फक्त अभ्यास दिला नाही… तर आयुष्याचा पाया घडवला, अभिमानाचा श्वास दिला, आणि जगभर फिरताना हृदयात जपायला एक अविनाशी नातं दिलं!


  • दिपिका सालगुडे
    महाराष्ट्र मंडळ क्रॅको (पोलंड)