शिवरात्री, शून्य आणि परदेशातील आपलेपण

Back to Community Updates
"पोलंडमध्ये साजरी केलेल्या साध्या, शांत आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या शिवरात्रीचा अनुभव."

शिवरात्री, शून्य आणि परदेशातील आपलेपण

शिवरात्री म्हटली की आठवतो शिवलिंगावर केलेला दूधाचा अभिषेक, उपवास, बेलपत्र आणि फुलांची सुंदर सजावट.

मी सध्या पोलंडमध्ये राहते आणि मनात कुठेतरी भारतातल्या शिवरात्रीची उणीव नक्कीच भासते. मंदिरातील आरती, धूपदीपांचा सुवास आणि घरातील पूजा हे सगळं आठवतं आणि मन थोडंसं हळवं होतं. या वेळी आम्ही साजरी केलेली शिवरात्री मात्र नक्कीच वेगळी होती.

संध्याकाळी आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो. कुठलाही मोठा बेत नव्हता. फक्त मनापासून पूजा करायची होती. छोटासा अभिषेक केला, फुलं अर्पण केली आणि सगळ्यांनी एकत्र बसून मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्या क्षणी जाणवलं हीच तर खरी शिवरात्री आहे, साधी, शांत आणि प्रामाणिक.

महादेवाचे वेगवेगळे मंत्र सुरू असताना हळूहळू मन शांत होत गेलं. रोज डोक्यात चालणारी विचारांची घालमेल, चिंता, भीती सगळं थांबलं होतं. काही क्षण तर असे आले की डोक्यात काहीच विचार नव्हते… फक्त शांतता होती. आणि तेव्हाच “शून्य” या शब्दाचा अर्थ मनाला स्पर्शून गेला. शून्य म्हणजे रिकामेपणा नाही, हे हळूहळू कळायला लागलं होतं.

परदेशात राहताना, आपल्या माणसांपासून आणि सवयींपासून दूर गेल्यावर आयुष्य कधी कधी शून्यासारखं वाटतं. पण याच शून्यातून स्वतःला शोधण्याची संधी मिळू शकते हे गुपित जणू मला उलगडायला लागलं होतं.

इथे मोठी पूजा किंवा अभिषेकाचा गजर असं काहीच नव्हतं, फक्त एक शांत संध्याकाळ, छोटासा दिवा आणि मनात चाललेला विचारांचा संवाद होता. त्या शांततेत मला जाणवलं की भगवान शंकरांचा खरा अर्थ हाच आहे की सर्व काही असूनही शून्य, आणि शून्य असूनही पूर्ण. अपेक्षा, अहंकार, भीती हे सगळं क्षणभर बाजूला होऊन मन अगदी शांत झालं होतं.

त्या दिवशी मनात कुठेतरी वाटत होतं हीच तर वेळ आहे परत एकदा आपल्या संस्कृतीकडे वळण्याची, आपल्या पूर्वजांनी जी ज्ञानाची शिदोरी आपल्याला दिली आहे ती जपून ठेवण्याची... पुन्हा एकदा शून्यात जाऊन नव्याने जगण्याची... आणि खरच अस जर झालं ना तर भारतात शून्याचा शोध कसा काय लागू शकला? हा प्रश्न मात्र येणाऱ्या नवीन पिढीला कधीच नाही पडणार.


अनुराधा गिरी
महाराष्ट्र मंडळ क्रॅको (पोलंड)